Monday, March 1, 2021

बसंत बहार !

 उमललेल्या फुलांकडे ती आता तासभर झाले बघत होती. तीन चार महिन्याआधी लावलेल्या चाफा , मोगरा ,गुलाब आणि तिच्या आवडीचं गोकर्ण याला इतकी सुंदर फुलं आली होती की घराची बाल्कनी अगदी दिवाळीतल्या लायटिंग सारखी दिसत होती. तिला अश्रू अनावर होत होते. तिला की नई घट्ट मिठी मारायची होती त्यांना. हिरव्या पानांना , मऊ फुलांना , कोवळ्या फांद्यांना सगळ्यांना मिठी मारून सांगायचं होत की " अरे किती उशीर लावलात यायला .. मी रोज वाट बघत होते तुमची.. पण आता मी तुम्हाला जाऊ देणार नाही अजिबात."

पण आत्ताच आलेली ती कोवळी फुलं , ही फुलं की नाही अगदी लहान बाळांसारखे असतात. त्यांना अलगद हातात घ्यावं लागतं. आई ला ना कळत च नाही भसकन तोडते फुलं . पण मिठी कशी मारावी ... तुम्हाला जवळ कसं घ्यावं ? .

 उन्हाची एक कोवळी तिरीप झाडा आडून येऊन तिच्या गालावर पडली. गुलाबातून येणाऱ्या त्या प्रकाशाने तिच्या गालावर गुलाबी ठसा उमटवला. त्या उबदार प्रकाशात प्रत्येक झाडाने जणू मिठी मारली . आता तिचा दिवस अत्यंत खुशीत जाणार होता. ती उडया मारत , डोलत बॅग घेऊन कामाला निघाली. फुलं सुद्धा डोलत होती आणि तिच्या परत येण्याची ते वाट बघत होते.

No comments:

Post a Comment