Monday, November 26, 2018

सूर्यास्तोदय

दिवाळी अंकाचा शेवटचा लेख वाचून आजोबांनी अंक रद्दीवर  ठेवला.आजोबांची ही नेहमीची सवय अंक किंवा पेपर वाचून झाला की कोणाचाही विचार न करता ते सरळ रद्दीत टाकतात. आजी ने चहा आणून दिला होता पण आज लक्ष ग्यालरीतुन खाली जात होतं.आज पुण्याहून नातू येणार होता . त्याची तयारी आजोबांनी आधीच करून ठेवली होती ."अग, तो पंखा पाच वर कर गं...या वर्षी मुंबईत जरा जास्तच गरम होतंय .त्याला सवय नसेल"आजोबा

"होय, आजी ने फॅन वाढवला , ...लाडू ही केले आहेत. मला सतत लाडू झाले का ??झाले का?? असं प्लिज नका विचारू. अनेक काम पडली आहेत."

आजोबांचं लक्ष एव्हाना पुन्हा गॅलरीतून खाली गेलेलं होतं. खाली खेळणाऱ्या मुलांचा हा अंपायर आज आपलं सगळं काम थर्ड अंपायर कडे सोपवून वेगळ्याच विचारात होता.

"ठाण्यापर्यंत आले असतील ना??"आजोबा

"लहान मुलाप्रमाणे सारखं सारखं नका हो विचारू , शांत बसून रहा बर खुर्चीत..येईलच आता."आजी

एखादा सणाची छोटं मूल जशी आतुरतेने वाट पाहतं तस आजोबा आज वाट बघत होते.

  "अ ssss प्पाssss"

मोठ्ठा आवाज आला .छोट्याश्या गळ्यातून एक मोठ्ठी आरोळी सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली .नातवाने लगेच आपली बॅग जागेवर ठेवली , हातपाय तोंड धुतले , दोघांना नमस्कार केला आजी आजोबांनी एकमेकांकडे फक्त स्मित हास्य केलं त्या एका स्मित हास्यामध्ये नातू नुसता शहाणा नाही तर समजुतदार सुद्धा झाला हे दिसून येत होतं. एक लाडू तोंडात टाकून "ऑप्पॉsss बिsssच??"

 नातू नेहमी आल्यावर हाच प्रश्न विचारतो आणि आजोबा नाही म्हणतात पण आज त्यांचं नुसतं उत्तर तयार नसून तेच तयार होऊन बसले होते.संध्याकाळी आजोबा आणि नातू दोघचं बीच वर गेले.बीच वर गेल्या गेल्या नातू दिसेल तिथे धावत सुटला.इवल्याश्या पायामध्ये सारा किनारा त्याला सामावून घ्यायचा होता."कित्ती मोठठ आहे ना... एकदम दहा मोठ" शाळेत दहा ही सगळ्यात मोठी संख्या असं शिकवल्यामुळे आपल्या शैलीत त्यानं किनाऱ्याच माप मांडलं.आजोबा सुद्धा नातवामागे पायाचं दुखणं विसरून धावत होते. आजोबा आणि नातवाने त्यानंतर किल्ला केला , भेळ खाल्ली , लाटांवर नाचले, गाणी म्हणली .किल्ला करताना माती चा बेस आजोबांनी केल्या नंतर "बास अप्पा आता किल्ला मी करतो ".किल्ल्यातील बोगदे , छुपे रस्ते, "हा इथे सैनिक इथे थांबणार, आणि सैन्य इथे" हे सगळं ऐकताना आजोबांना भरून आलं. या काही वर्षांमध्ये त्याचं बोलणं बदललं नव्हतं तर आता तो मोठा झाला होता . तो आता अप्पांचा शानु  राहिला नव्हता तर शिवाजी महाराजांच्या सैन्यातला "खबरदार जर टाच मारुनी..." असं म्हणणारा सरदार  होत होता. आजोबा सहजच हसले .त्यांचा बालपणातील त्यांनी बनवलेला किल्ला आणि त्याचं सैन्य  त्यांच्या डोळ्यासमोर क्षणार्धात एका लाटेप्रमाणे आदळून गेले.नेहमीच्या प्रमाणे त्या लाटांनी तो किल्ला मोडला . 'दर वेळेस मी लाटांच्याच जवळ किल्ला का बनवतो?' आजोबांचा लहानपणापासून चा प्रश्न त्यांनी पुन्हा मनातल्या मनात विचारून  आजोबा हसले. पण तो पर्यंत नातवाने आपले लक्ष किल्ल्यावरून हटवले होते."अप्पा ते पा, सूर्योदय.." सकाळची शाळा असल्याने त्याने तोच पहिला होता.आजोबांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला "अरे बाळा सूर्यास्त... सूर्य बुडतो ना... "

"श्या..सूर्य उगवताना मी रोज बघतो"

सूर्य उगवताना आणि मावळताना सारखाच दिसतो नाही?फक्त सकाळचा लाल गोळा हा तळपण्यासाठी सज्ज होत असतो आणि संध्याकाळचा तळपुन शांत होत असतो.

आज तश्या उसळणाऱ्या लाटा नव्हत्या, तसा आज शांत होता. कधी कधी असं घडतं, लाटांचा आवाज आपल्याला ऐकत राहवासा वाटतो.आज आजोबा आणि नातू शांत होऊन लाटा पायावर घेत बसले होते

दोघेही त्या सूर्याकडे आपापल्या नजरेने बघत होते.

सूर्य अस्ताला जात होता आणि रात्रीच्या गर्भात त्याच्या सारखा तळपता गोळा दुसऱ्या दिवसाची तयारी करत होता...उद्याच्या सूर्योदयाची 

Thursday, November 8, 2018

प्रिय पु.ल. आपणास.....

प्रिय,
पु.ल.
      आजपासून तुमचं जन्मशताब्दी वर्ष  सुरू झालं आहे. सर्वप्रथम वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. तुम्ही लिहिलेले लेख, तुमचे नाट्यप्रयोग, तुमची गाणी आणि याही पेक्षा तुम्ही लोकांना जे हसवलंय  या सर्वांचा सार( अमृतच खरंतर) ह्या वर्षात  कार्यक्रमांच्या माध्यमातून होणार आहे.
कार्यक्रमावरून आठवलं मागे एकदा एका कार्यक्रमाला गेलो होतो तिथे गटणे, अंतू बर्वा, या पात्रांवर  सादरीकरण चालू होतं. लोक त्या शब्दात आणि नाट्यात इतके रंगले होते की पात्रांनी म्हणण्याआधी पुढचं वाक्य प्रेक्षकांमधून येत होत.
लहानपणी पुस्तकांचं वेड तुम्ही लावलं. तुम्हाला प्रत्यक्ष पाहू शकलो नाही हे आमच्या पिढीचं दुर्दैवच म्हणायचं. पण तुम्हाला जे ऐकलंय, वाचलंय, त्यावरून निश्चित सांगू शकतो की लाडके व्यक्तिमत्त्व हे नुसतंच लाडकं नसून आदर्श सुद्धा होतं आणि आहे. अनेकांसाठी देवासारखे धावून जाणाऱ्या तुम्हाला देव मानण्याची गरजच वाटली नाही.

पाडगावकर लिहितात "पुल स्पर्श होताच दुःखे पळाली.... निराशेतूनी माणसे मुक्त झाली जगू लागली हास्य गंगेत न्हाली" किती समर्पक ओळी

या हास्यगंगेमध्ये आपली सर्व दुःख धुवून माणसं आजही जगायला शिकले आहेत आणि जगताय, जगवताय. आज लहान मुलांना सुद्धा पुल पाठ आहेत तो वाचतो, संवाद बोलतो, कुणी गाणं म्हणतं, कुठे फुलराणी फुलायला लागते;  कारण या हास्य गंगेचा उगम तुमच्या हृदयापासून झाला आणि तो मिळाला या सर्वांच्या हृदय सागराला.

खरंच स्वर्गात ब्रह्मदेवाने विचारल्यानंतर तुमच्या आधी अगणित प्रेक्षकांनीच ब्रह्मदेवाला उच्च स्वरात सांगितलं असेल "की या माणसाने आम्हाला हसवलं" आणि ब्रह्मदेवाने सुद्धा हसत हसत मान्य केलं असेल यात काही शंकाच नाही. त्यांची काय आता चैन आहे पृथ्वीलोका वरील न संपणारे किस्से त्यांना स्वर्गात बसून ऐकता येणार आहेत आणि खरोखरच स्वर्गसुख मिळणारे हे नक्की.
पुन्हा एकदा शुभेच्छा.
                                           तुमचाच,
                                         अमोघ वैद्य

Thursday, October 18, 2018

म्यानर्स...


दोन चार दिवस मी घरातून बाहेरच पडणार नाहीये.जिथे तिथे हा प्रकार वाढतच चाललाय.तुम्हाला सांगतो बाहेर पडायची भीतीच वाटते आता.माझ्या आतापर्यंतच्या त्रासांमध्ये नंबर एक च्या हि वरती कोणाचा नंबर लागत असेल तर तो या म्यानर्स वाल्या लोकांचा. आपण आपल्या प्रमाणे चालतो हो!! पण हे असे बघतात कि “तुला देहांत प्रय्श्चीत्ताशिवाय गत्यंतर नाही”.अत्ताचीच गोष्ट. एका नवीन मित्राच्या घरी  त्याने बोलावलं म्हणून गेलो होतो.घर म्हणजे घर नाहीच मला तर ते मोठा हॉटेल च वाटलं.घरात शहनाई (का पिपाणी?) शांत आवाजात चालू होती. मी आपल्या चपला सोई प्रमाणे घराबाहेर काढल्या. “अरे इथे नाही आत काढ” हे म्हणजे जरा वेगळच होतं.म्हणजे आता पर्यंत ‘चपला घराबाहेर काढव्यात’ अश्या पाट्या वाचणारा मी हे ऐकून आता चपला ठेवायच्या तरी कुठे या प्रश्नात मी पडलो असता त्या महाशयांनी जवळच्याच एका कपाटाच दार उघडलं आणि “हां इथे ठेव” म्हणजे चपला या कपाटात  ठेवायच्या? असो सांगितल्या प्रमाणे मी आपल्या त्या हाताने चपला कपाटात ठेवल्या. आत पाहतो तर मोठा सोफा , मोठं टेबल, लाईट चा झगमगाट आणि ते मागचं गाणं.आणि त्या सगळ्या वातावरणात “आक् छी!!” असं माशी शिंकण्याचं काम माझ्या शिंकेने झालं.बस्स!!! ते वातावरण बदलण्यात माझा हातभार बराच लागला होता कारण त्या नंतर सगळे माझ्या कडे एकटक बघत होते. शिंकेनंतर मी “स्कु्युझ”मी किवा “ब्लेस मी” असं म्यानर्स प्रमाणे वागणं अपेक्षित होतं.शेवटी माझा मित्राने उगा “हहह ब्लेस यु” म्हंटल. मला ओशाळल्या सारखच झालं. पुन्हा जेवणाच्या टेबलावर हि तसच  भयंकर शांतता ( मागं ते music चालूचे) चमच्याचा सुद्धा आवाज करायचा नाही.मी आपलं खाणं घाश्खाली घातलं ,आवंढा गिळला आणि उगाच आपलं इंग्रजी मध्ये “ok bye, see you latter (R र्ळ सारखा ... तेवढच वजन पडत इति सम्या गोखले )
मला खरोखर या लोकांची भीती वाटते. केव्हा,कुठे आणि कसे भेटतील याचा काही अंदाज नाही म्हणून मी सहसा पॉश हॉटेल असेल तर दोनचार मित्रांचे सल्ले घेऊनच जातो.डिश च्या कोणत्या बाजूला चमचा आणि काटाचमचा ठेवायचा?रोटीची प्लेट कोणती आणि भाजीची कोणती?त्या धार नसलेल्या सुरीने करायचं काय असतं?असे प्रश्न मला तिथे बसल्यावर उद्भवतात. बर ती सुरी धरायची पण एक पद्धत असते म्हणे.
हे लोक इथेच थांबत नाहीत तर कुठे जांभई आली कि तोंडासमोर समोर चुटक्या वाजवतात. मला काही दिवस कळतच नव्हतं मला वाटायच कि आवाज सुधारण्यासाठी असेल बुवा!!.पण ते म्यानर्स असतात.थोड चुकलो कि “म्यानरलेस!!! म्यानरलेस!!!” असे शब्द कानावर येतात.
याच लोकांची पुढची स्टेज म्हणजे सोफेस्टिकेटेड.या लोकांचा मला विशेष राग आहे. “काय रे!! कसाएस??” हा किती सोपा प्रश्न आहे कि नाही. एखादा माणूस “मस्त” असं उत्तर देईल पण हे “mir geht es gut.und dir?” अश्या सवती भाषेत उत्तर येतं. “अरे avengers पाहिला का?” असं विचारावं तर “छे रे असल्या कसल्या फिल्म्स बघतात रे!! Art films बघा,art films!! मी तर तेवढ्याच बघतो.”
या लोकांबरोबर party ला जायचं म्हणलं कि धस्सच होतं.मध्ये एकदा अशाच एका party ला गेलो होतो.आणि नेमका एक अख्खा गटच तिथे आला होता मग काय त्या सिंहाच्या party मध्ये मी उंदीर आल्यासारखा बसलो होतो. त्यांच्यात म्हणजे ‘काही बोलायचे आहे पण बोलणार नाही’ अशी स्थिती असते.
“अरे मी us ला जाऊन आलो. परिस्थिती काही चांगली नाही बरका म्हणजे आपला ट्रम्प आहे ना ट्रम्प....”(छे छे छे त्या पुणेरी महाभागाने ट्रम्प जणू पुणे महानगर पालिकेत असल्या  सारखं ‘आपला’हा शब्द वापररला) किंवा “ अरे मी आताच john lock ची philosophy वाचली. कहर आहे रे कहर....वगैरे वगैरे त्यानंतर foreign culture,museums , किंवा art gallery मधलं आपल्याला बिलकुल न कळलेल्या पेंटिंग विषयी स्तुती सुमनं.
ह्यांच्या पासून वाचायचा एकच मार्ग आपण सुद्धा असेच वाहत्या गंगेत डुबकी मारावी – नाही नाही नाही हे शक्य नाही कदापि नाही.कधी कधी मी असं करण्याचा प्रयत्न करतो पण गीतरामायणाप्रमाणे “पुण्य सरे कि,सरले माझ्या बाहू मधले प्राण.आज का निष्फळ होती बाण ” या प्रमाणे हालत होते . पुन्हा ते वरचढ ठरतात आणि मी आहे रे गटातून नाही रे गटात येवून बसतो
थोडक्यात काय तुम्ही कितीही विद्वान असाल पण जर तुम्हाला काटाचमच्याने आणि त्या धार नसलेल्या सुरीने खाता येत नसेल तर तर तुम्ही निव्वळ अज्ञानी ठरतात.आणि चारी बाजूंनी आवाज येतो.
“म्यानरलेस!!!  म्यानरलेस!!!”
छायाचित्र - सिद्धार्थ जोशी (@joshisid -on insta)

Monday, June 4, 2018

माझे (अ) शुद्धलेखन भाग - २

जसं मराठी तसं संस्कृत. मुळात संस्कृतातलं शुद्धलेखन आणखी कठीण.मला बरीच म् आणि अनुस्वार कधी द्यावे हेच कळत नव्हतं. संस्कृतच्या पेपरमध्ये मराठी शुद्धलेखन आणि सुभाषिते पूर्ण करा तिथलं शुद्धलेखन; यातल्या चुका जर पाणिनीने पहिल्या असत्या तर त्याने “ब्रम्ह सत्य जगत मिथ्या” मानून स्वतःचे व्याकरण घेऊन दूर कुठे तरी निघून गेला असता. 'देव','वन','माला' हे शब्द मला जमतात हो, पण पुढे 'कवी','वारिणी','नदी' हे शब्द आल्यावर पोटात गोळा येतो. संस्कृतात “निरंकुशाः कवयः” असं वाक्य आहे. हे वाचून आपणही कवी व्हावं(म्हणजे सगळं माफ!!!) असा विचारसुद्धा डोक्यात येऊन गेला.
    तीच गत हिंदीची. इथे शुद्धलेखन तर  नंतर; पण हिंदी कसं  बोलावं इथून सुरवात असते.”तुम बागेमे आने वाला है क्या?” असे बोलल्यामुळे हिंदी साहित्यिकांनी वारंवार आपल्या कपाळावर हात मारून घेतलेत.
  ह्रस्व – दीर्घ वेलांटी आणि उकार यांनी मला वेळोवेळी छळले आहे. ’चू’ल आणि ‘चु’लीवर ह्या शब्दांना दीर्घ चा ह्रस्व होणे. घसा आणि घशाचे यात ‘स’ चा ‘श’ होणे किवा शेवटी वेलांटी आली तर ती दीर्घ असावी(जशी ‘असावी’ तली ‘वी’ ) या नियमांनी माझे शालेय जीवन खाल्ले.
आताच्या चौथीच्या मुलाने जर अश्या चुका केल्या तर "व्हॉट ईज धिस? धिस ईज राँग.द राईट वर्ड ईज....." मग तो बॉय राईट वर्ड लिहिणार आणि “गुड बॉय” अशी पदवी त्याला मिळणार .
आमचं शुद्धलेखन बघून आमचे शिक्षक आमच्या हातावर सप्तसूर काढायचे आणि मग ते सुधारल जायचं.
ह्या पाच  भावंडांमध्ये अनुस्वार, ओंकार,एकार हे तसे फार सज्जन. पाच पाण्डवांमधले हे तीन वेगळे धनुर्धर.यांना ह्याचा ना कुठला त्रास ना कुठली तक्रार. ह्रस्व आणि दीर्घ यांच्या नादाला ते जातच नाहीत. एखाद्या समाज सेवकासारखे ते संपूर्ण वेळ समाजाची सेवा करत आपलं आयुष्य सार्थकी लावतात. हे बहुतेक सगळ्यांच्या मर्जीतले त्यामुळे व्याकरणकर्त्यांनी बऱ्याच वेळेला शब्दांच्या शेवटी नाही तर पहिले टाकलं आहे.
   विरामचिन्हे हा प्रकार माझा सर्वात आवडीचा. हे वाक्यांना पूर्ण स्वरूप देतात त्यामुळे मी यांना game changer असं म्हणतो. माझा एक मित्र आहे - 'आदित्य रानडे' खरंतर तसा हा हुशार मुलगा. पण शुध्लेखनामुळे त्यांचं जवळ जवळ होणारं प्रेम रांगोळीसारखं फिस्कटलं. खरंतर या मुलाने प्रेमपत्र खूप मेहनतीने आणि आमच्या मदतीने '‘लिहिले'’होते. पण त्यावर शुद्धलेखनाच्या एका वाक्यामुळे पाणी सांडलं. ते वाक्य पुढीलप्रमाणे-
“चांदण्यांचे कोश माझ्या, प्रियकराला पोहोचवा” या पोहोचवा मुळे तो 'भाऊ' या कॅटगरीमध्ये पोहोचला होता. कारण एका स्वल्पाविरामाने त्याच्या प्रेमाला पूर्णविराम दिला होता.
ह्या शुद्धलेखनाने खरोखर माझे बाल्यजीवन वेठीस धरले.आजही कोणी मला शुद्धलेखनाबद्दल विचारलं तर गुपचूप google वर सर्च मारतो. नाहीतर पेपर वर लिहून कुठलं बरोबर आहे ते तपासून घेतो. अहो, उद्या ब्रह्मदेवाला जरी विचारलं ना, “काय रे बाबा ? शारीरिक मधला पहिला री आणि दुसरा रि कोणता तर तों सुद्धा जगाची सगळी कामं सोडून आपली चारी डोकी या विचारात गुंतवेल. शेवटी तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आला म्हटल्यावर आणि मराठी येत असताना शालेय जीवनात हा त्रास भोगावा लागणारच आहे.
कारण शब्द जर शस्त्र असले तर शुद्धलेखन नक्कीच त्याची धार आहे.

Monday, May 21, 2018

माझे (अ) शुद्धलेखन भाग -१




“मीत्रा,
काय म्हणतोस सर्व काहि कूशल आहे ना? बर्याच दीवसात भेटलो नाहि.लवकरच पूण्याला येतो आहे.तेव्हा भेटु. शीक्षकांना सुद्धा भेटायचं आहे .तूझ्या सोबत शाळेत जाऊन येईन म्हणतो.त्यामूळे वेळ बाजुला काढुन ठेव.”
हा मेसेज आशुतोष असनीकराने मला पाठवला होता.ह्या माणसाचा त्याच्या शुद्धलेखनावर प्रचंड विश्वास आहे म्हणून त्याने ते कधीच सिरीयसली घेतलं नाही.त्याची आणि माझी मैत्रीच मुळात शुद्धलेखनामुळे झाली , कारण संपूर्ण वर्गात तो आणि मीच काय त्या चुका करायचो.
माझ्या शालेय जीवनात माझं मार्कसिक शोषण जर कोणी केलं असेल तर ‘शुद्धलेखन’ याने. गणिताबरोबर दुसऱ्या नंबरला येणाऱ्या या दैत्याने माझी चांगलीच भंबेरी उडवली आहे. माझं जवळपास सत्तर टक्के शालेय बालपण हे मो.रा. वाळिंबे यांचं शुद्धलेखनाचे नियम वाचण्यात गेलं. मुळात मला शुद्ध बोलता येतं,वाचता येतं(असं मी मानतो), पण माहित नाही लिखाणाच्या वेळेस नक्की काय घडतं.आम्हाला ना शाळेत “या दिनाला त्या दीनाने अमुक अमुक केले” अशी वाक्य टाकली जायची मग पहिला दिन कोण आणि दुसरा कोण हे मी दीनवाणेपणाने  सांगायचो. दिवाळीचा तर अभ्यास विचारू नका ‘ त्या काळी ’ आम्हाला दिवाळीचं व्यवसाय दिले जाई. त्या बालवयात ह्या व्यवसायाचा गुंता सोडवण्यात काय नाकीनऊ आलेत हे विचारू नका.त्यामध्ये आम्हाला असेच प्रश्न विचारले जायचे.पण त्याची उत्तरं काय हो घरच्यांना विचारून लिहिता यायची.पण सगळ्यात भयंकर प्रकार कोणता असेल तर तो ‘ निबंध '.
आम्हाला मराठी या विषयाला गायकवाड सर म्हणून  रुद्राचे अवतार होते. प्रत्येक गोष्ट ते चिडूनच शिकवीत.कोणतीही गोष्ट आपल्या उच्च स्वरापेक्षा जास्त ओरडून सांगितली की मुलांना लगेच लक्षात राहते (घाबरून) या त्यांच्या मतांच खंडन साक्षात प्रिन्सिपॉल पण करत नसत. राग (संगीतातला नाही!!)  त्यांच्या नाकावर आणि छडीवर तांडवच करीत असे. ‘श्रावण मासी हर्ष मानसी’ ही कविता शिकवताना आम्हाला राठ जमिनीवर  प्रखर ऊन पडलय आणि त्याचे वर्णन म्हणजे ही कविता असं ते शिकवीत. त्या रुद्राचा तिसरा डोळा हा सतत शुद्धलेखनावर असे. त्यांच्या वाणी  मधून आग वर्षाव होतोय असाच वाटायचं . माझा मित्र अत्या सांबारे त्यांना 'अग्यामोहोळ' म्हणायचा.त्यांना मागे कोण बोलतोय हे लगेच कळायचं त्यामुळे "ह्यांना फिक्स तिसरा डोळा आहेच !!!अरे खरच"अश्या अफवा सुद्धा पसरल्या होत्या.त्यांच्या ओरडण्याने समोरच्या बिचाऱ्या विद्यार्थ्यांचे काळीज भस्मसात होऊन पाणी पाणी होई. बऱ्याच वेळेस तो बिचारा मीच असायचो.
खरंतर मला गप्पा मारायची प्रचंड आवड त्यामुळे मी प्रश्न-उत्तरं तोंडी पाठ करायचो. वास्तविक ‘प्रश्नाला’ ‘न’ का लागतो हे मला आज पर्यंत कळलं नाही.कारण म्हणताना आपण ‘ण’ म्हणतो. असो,मी पाठांतरात चांगला असल्यामुळे अगदी जोरदार पाठ करून ठेवायचो. पण लहानपणी आपण लेखी परीक्षेला सामोरे जातोय याचा सिरीयसनेस कधी नसायचा(नसतोच!!!). मी आठवीत असतानाची गोष्ट –
सहामाही परीक्षा मी अशीच पाठांतरावर दिली होती.त्यामुळे माझा निकाल लागला. त्यावेळी पालकसभेत माझा मराठीचा पेपर संपूर्ण वर्गामध्ये फिरवला होता.माझ्या गुणांपेक्षा माझ्या शुध्दलेखनाच्या चुकांचा आकडा जास्त होता!!!! “सगळं येऊन सुद्धा या कार्ट्याने शुद्धलेखनात मार्क घालवले, श्या!!!” या वाक्यावरून गणितात कश्या सिली मिस्टेक करतो तश्या काहीश्या झाल्या असाव्यात असं वाटलं. पण या सिली मिस्टेक नसतात. एक वेळ +, - करायला सोपं आहे पण शुद्धलेखन नाही.
मी त्यानंतर शुद्धलेखनाच्या क्लासला सुद्धा जाऊन आलो. पण ‘तेरड्याचा रंग तीन दिवस’ याप्रमाणे मला मिळालेल्या शाईपेनचं कौतुक होतं तोपर्यंतच तो क्लास टिकला. (३ते४ दिवस) आमच्या घरात तर “ घरोघरी शुद्धलेखन”, “शुद्धलेखन तुमच्या हातात”, “१० दिवसात शुद्ध करा लेखन”अशी विविध पुस्तकं आली. त्या पुस्तकांमध्ये ‘अमर कमळ बघ’ पासून तर ‘एकसमयावच्छेदेकरून’ पर्यंत सगळं होतं. पण माझ्या बाबतीत मी नसलो तरी माझे ‘ मार्क्स ’ माझ्या विरोधी होते.
एकवेळ मी दिन आणि दीन मधला फरक समजू शकतो पण ‘आणि’ तला ‘ण’ ह्रस्व ऐवजी दीर्घ काढल्याने काय होतं ? क्रीडांगणातला ‘क्री’ ह्रस्व केल्याने खेळ बदलत नाही आणि ‘मी’ चा ‘मि’ केल्याने मीपण जात नाही. पण हे शुद्धलेखन माझ्या बालवयात कड्या टाकण्याच काम करत होतं. शारीरिक ह्या शब्दाने तर मला इतका त्रास दिलाय, काही विचारू नका (अगदी ‘आत्मिक’त्रास म्हणा ना).इ आणि ई यांच्या कडे बघून इ आणि ई याच भावना आल्या आहेत.
                                                                क्रमशः

छायाचित्र -सिद्धार्थ जोशी

दुसऱ्या भागासाठी 👉🏻👉🏻https://arvaidya.blogspot.com/2018/06/blog-post.html

Wednesday, April 25, 2018

फॅशन

"हे बघ , हे कसं वाटतंय?" जग्या  ने माझ्या समोर फॅशनगली मासिक टाकत विचारलं.
"छ् नाही रे विचित्र दिसतंय हे ध्यान ; हे नको"-- मी मुखपृष्ठ बघत म्हणालो
" अरे हल्ली असेच कपडे घालतात तुला ना लेका फॅशन चा सेन्स च नाहीये"
" अरे पण हे असं, त्या पेक्षा साधा शर्ट घाल ना!!"-- मी
"अरे मित्रा फॅशन रे !!!फॅशन. तुला नाही कळणार.चल आपण कपडे घेऊन येऊ" --जग्या.
कोणाकोणाच्या काय आवडीनिवडी असतिल काही सांगता येत नाही. अगदी आपल्या सगळ्यांच्याच असतात . पण काही लोक हे पराकोटीचे तपस्वी असतात ते याच्या ही पुढे असतात.त्यांचे शौक म्हणजे बघण्यासारखे असतात.माझ्या एका मित्राला रोज अत्तर लावण्याचा शौक आहे- दुसर्यांना. सकाळपासून तो सगळ्यांना अत्तर लावत असतो (आणि मला चुना). तर माझ्या एका दिग्दर्शक मित्राला तपकीर ओढण्याची फार हौस आहे.त्याच्या मते तपकीर ओढून शिंक आली की आपले आधीचे विचार बाहेर पडतात म्हणे आणि मग नवे विचार येतात.आमच्या जग्या पांडे ला फॅशन चा शौक. फॅशनगली तर तो पोथी सारखं वाचतो. वेगवेगळे प्रयोग करतो.
 फॅशन च्या नावावर काहीही चालू शकतं यावर माझा नितांत विश्वास बसला हा तो प्रसंग. तुम्ही विश्वास ठेवू नका पण आपल्या आजूबाजूला बघाल तर या फॅशन च जाळं पसरलंय.केसांची फॅशन म्हणू नका.डोळ्यात,ओठात रिंग घालण म्हणू नका,वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालायची - फॅशन. तुम्ही पॅन्ट वर घाला आणि शर्ट खाली ती सुद्धा- फॅशन.
जग्या पांडे याच माणसांमधला. त्याच्या डोक्यातल्या फॅशन नावाच्या गोमेने संपूर्ण डोकं पोखरून ठेवलंय; आणि आज त्याला फॅशनगली च्या कार्यक्रमात जायचं होतं.त्या साठी ही तायरी.'त्या' फोटो सारखी फॅशन करायची म्हणून 'आम्ही' वणवण फिरलो ; पण आम्हाला तशी विचित्र पॅन्ट आणि विचित्र शर्ट कुठे मिळाला नाही (का मिळेल?).शेवटी त्या फोटो मध्ये बदल करून स्वतः चीच एक वेगळी स्टाईल करायची हुक्की भाईंना आली.
तास -दीड तास ह्या माणसाने कपडे बदलावण्यात घालवला आणि "ढॅण्टँढॅण्" असा उभा राहिला.त्याचं ते 'बावळे सुंदर रूप खरोखर' असं म्हणायची पाळी आली होती. डोक्यावर गांधी टोपी,डोळ्यावर गॉगल, ती टाईट पॅन्टआणि तेवढाच लूज शर्ट आणि सगळ्यात कहर म्हणजे या सगळ्यांच्या खाली चप्पल!!!
मी आपला झब्बा आणि पायजमा यावरच होतो.खरं सांगू का मला न बाहेर जायचं म्हणलं ना की या दोघांशिवाय काही वेगळं सुचतच नाही.असो!!
जवळच समारंभ असल्याने आम्ही चालत अगदी पाच मिनिटात पोहोचलो खरे.पण रस्त्यावरची लोकांची तिरपी नजर चुकवत आम्ही जात होतो."ह्या लोकांना सेन्स च नाही रे फॅशन चा"असं हा जग्या वेळोवेळी म्हणत होता.कसेबसे आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो.

तिथे म्हणजे फॅशनगली चा महासंगम च घडून आला होता. कोणी डोळ्यात रिंग घातली होती,तर कोणी वरती लाल शर्ट तर खाली हिरवी पॅन्ट घालून आलं होतं. आमच्या बाबांच्या भाषेत चित्काब्र!!. सगळे माझ्याकडे बघत होते. या सगळ्या राजहंसात हे बदकाचं पिल्लू कोणी सोडलं अशी माझी गत झाली होती.
दोनचार लोकांशी हा कश्यतारी  तरी फॅशनच्याच भाषेत बोल्ला आणि मग आम्ही बसायला जागा बघून बसलो. पण खरी मजा इथूनच सूरु झाली . हा पठ्ठा काय बसतच नव्हता याचा चेहरा कवराबावरा झाला.हळूच त्याने घाम टिपला. याला काहितरी होतंय याची जाणीव मला झाली.
"काय रे काय झालं?"-- मी
त्याने एका कोपऱ्यात मला नेलं म्हणजे नक्की काही तरी मेजर घोळ आहे माझ्या लक्षात आलं.
"अरे ऐक ना!!! ही पॅन्ट इतकी टाईट आहे की मला बसताच येत नाहीये. घुढग्यातून पायच वाकत नाहीये ,आणि जर का मी बसलो तर..."
ह्या गोष्टी वर काय करावं मला काहीच कळत नव्हतं.तेवढ्यात मि. सुब्रमण्यम तिथे आले आणि
"अरे इकडेss काssय करतोयस रे .चल, पुढे जाऊ " म्हणून त्याचा हात धरला आणि ओढून घेऊन जात होते.लहान मुलाला आई शाळेत सोडून जाताना ते लहान मूल आईकडे कसं बघत तसं जग्या माझ्या कडे पाहत होता.त्याच्या डोळ्यात पँटच्या निर्वाणीचं भविष्य दिसत होतं.
मला लिटरली सगळं स्लो मोशन मध्ये दिसत होतं. त्याला आता खाली बसवणार म्हणल्यावर मी आपले डोळे बंद करून घेतले. आणि पुढच्या काही वेळात कॅमेरा चे आवाज आले. मी डोळे उघडून बघतो तर काय !!! हा पठ्ठा स्टेजवर आणि खाली घुढग्यातून फाटलेली ती पॅन्ट.मी तडक त्याच्या जवळ गेलो .त्याने मला कानात सांगितलं "फॅशन रे!!! फॅशन" मला काय समजायचं ते समजलं .
आठवड्यानंतर एका छान रविवारी घरात वेगवेगळे आवाज येऊ लागले. वास्तविक रविवार म्हणजे काहीही न करण्याचा वार. त्या दिवशी जग ईकडचं तिकडे झालं तरी माझी दुपारची झोप कोणी मोडू शकत नाही.पण या आवाजाने आज जाग आली.
मी आत खोलीत जाऊन पाहिलं तर साहेबांनी त्यांचे सगळे कपडे उसवून त्याला नवीन स्वरूप देण्याचं काम काढलं होतं.
"अरे!! कसला हा पसारा?!!"
त्याने काहीही न बोलता माझ्या हातात  त्या आठवड्याच फॅशनगली दाखवलं. त्यात चक्क त्याचाच फोटो आणि तो ही कव्हर पेजवर ' न्यू फॅशन ऑफ दि वीक' असल्या मथळ्याखाली.
"बघ बघ नवीन फॅशन ट्रेंड सुरू झालाय माझ्यामुळे"
मी काही बोलणार तेवढ्यात "आता मला काम करू देत बरं सगळ्यांची नवीन फॅशन करायचीय" असं बोलून त्याचं काम सुरू केलं.
हा मनुष्य फॅशन च्या त्या गल्लीत पूर्णपणे हरवून गेला होता; आणि मी मात्र त्या गल्लीत माझे साधे कपडे शोधत होतो.

छायाचित्र - अर्पिता रोकडे

Thursday, April 12, 2018

पुढे काय ?

सकाळी १०:३० वाजता कॉलेजचं ऑफीस उघडतं. म्हणजे उघडतं १०:३० ला, पण कर्मचारी ११ वाजता येतात. मी अकरा वाजता ऑफिस बाहेरच्या लायनीत उभा होतो. कारण आज मला अकरावीचा फॉर्म भरायचा होता आणि एकदाचा मी सुटणार होतो . हो, कारण मी एका  भयंकर फेज् मध्ये  अडकलो होतो .
सांगतो-
माणसाच्या शिक्षणाचे काही महत्त्वाचे टप्पे आहेत. पहिली ते चौथी, पाचवी ते दहावी, ११वी आणि १२वी , आणि बी. ए. , एम.ए वगैरे. पण या सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे दहावी. माझी दहावी संपून साधारण आठवडा झाला होता. मला वाटलं होतं की सुट्टी सुरू; पण तसं नव्हतं. एका भयंकर सकाळी एक फोन आला
"हॅलो, मी अंजु मावशी बोलतेय"
"बोल मावशी "मी म्हणालो
"मग कशी चालूए सुट्टी ?"
हा प्रश्न विचारण्यामागचं करण काही वेगळच आहे हे माझ्या सारख्या पामराला कळलंच नाही.
"एकदम मस्त, फुल एन्जॉय"
हे वाक्य झाल्या नंतर एकदम गंभीर आवाजात
" हे बघ, हे सगळं ठीक आहे . पण तू आता आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर आहेस.आता जर योग्य निर्णय घेतला नाही तर...... त्यामुळे पुढे काय करणारेस्?"
'पुढे काय करणार' ह्या प्रश्नाचा विचार मी केलाच नव्हता. सुट्टी सुरू होऊन आत्ताशी एकच आठवडा झाला होता . मला सांगा कुठल्या मुलाला सुट्टी सुरू झाल्यानंतर 'आयुष्याचा' विचार कर असं कोण सांगतं? इथे दहावीची परीक्षा दिली अन् मला वाटलं संपला अभ्यास आता नुसता आराम . " पण तसं नसतं, पुढे काय आणि कसं करायचं याची तयारी करण्याचा वेळ असतो " इति आई.
हा पहिला फोन आला आणि त्या नंतर रोज बऱ्याच लोकांचे फोन येणे सुरू झाले. काही वेगवेगळे विषय सुचवायला लागले.
"ज्ञानेश चं तर ठरलं सुद्धा!!", " आमच्या मधुराचं कनी आठवीतच ठरलं होतं आय.आय. टी. ला जायचं" अशी वाक्य ऐकू येऊ लागली.
तसं पहायला गेलं तर मला लहानपणापासूनच ड्रायव्हर व्हायचं होतं. मस्त गाडीतून फिरायचं. पण मी नुसत्या सायकल वरूनच बऱ्याच वेळेला पडल्या मुळे मी तो विषयच सोडला.या सगळ्यात आमच्या घरच्यांनी विविध ठिकाणाहून माहिती काढली होती . आणि एका संध्याकाळी आमच्या घरात सभा भरली.
सभेचे अध्यक्ष बाबा आणि आई.
" आपण संदीप ला विचारुयात का इंजिनिअरिंग बद्दल?" बाबा.
"मी इंजिनिअरिंग करणार नाही"मी.
"मग मेडिकल ?"
"माझं काहीही ठरलेलं नाही"मी टिळकांसारखा ठाम पणे उत्तर देत होतो. थोडक्यात ती सभा मी बंद पाडली.
एकाने मला "मिडीया अँड कम्युनिकेशन घे; त्यात जर्नालिझम घे हां!!!" " एकदम तडफदार वर्तमानपत्रात लेख लिही”. पण तडफदार नक्की काय  लेख का वर्तमानपत्र हे नाही सांगितलं.
माझे बरेच मित्र मानसशास्त्र घेणार होते त्यामुळे त्यांच्या दवाखान्या शेजारी माझा ही असावा असं त्यांना वाटत होतं
पण खरं सांगू का , मला नसतं हो जमलं डॉक्टर ,इंजिनिअर किंवा पोलीस व्हायला . एकतर मला रक्त पहावत नाही. दुसरं म्हणजे माझं गणित कच्च आहे आणि पोलीस व्हायला जावं तर कोणी मला गाडी चालवताना दम दिला तर मी स्वतः लेन बदलतो. त्यामुळे हे तीन पर्याय शक्यच नव्हते. या  सगळ्यांसमोर एकच पर्याय दिसत होता -अॅप्टीट्युड टेस्ट.
मी आणि माझा मित्र अव्या नांदेडकर असे दोघांनी मिळून टेस्ट देण्याचं ठरवलं.ठरल्या वेळे प्रमाणे आम्ही इमारतीच्या पायथ्याशी जमलो . सगळी तयारी झाली होती. आम्ही कॉम्प्युटर वर बसलो आणि मग प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. ही अॅप्टीट्युड टेस्ट म्हणजे एक प्रकारचं कोर्ट च असतं. आरोपीच्या पिंजऱ्यात कॉम्प्युटर समोर आपण बसतो . मग प्रश्न विचारले जातात  आणि मग सिस्टीम साहेबा तुमचा निकाल देते( लावते?) . त्यात गणिताचे प्रश्न तर काय विचारू नका गुणाकार म्हणू नका ,भागाकार म्हणू नका, सुडोकू म्हणू नका.  या सगळ्या चाचण्या पार करून आम्ही पुढच्या टप्प्यावर पोहोचलो तो म्हणजे 'इंटरव्ह्यू'. या गोष्टीची मला मनापासून भीती वाटते. एका शाळेत प्रवेश घेण्यासाठी इंटरव्ह्यू घेणार होते तर त्या शाळेत भीतीमुळे मी प्रवेशच घेतला नाही. पण इथे काही पर्याय नव्हता .
जे माझा इंटरव्ह्यू घेणार होते त्यांच्या समोर मी जाऊन बसलो. पाहिले तर माझा पांढरफटक पडलेला चेहरा पाहून त्यांनी मला पाणी प्यायला दिलं. मला फार भीती वाटते हो . दिलेलं पाणी मी गटागटा संपवलं . त्यानंतर मला माझे छंद वगैरे विचारण्यात आलं . माझं गणित कसं कच्चय हे पुन्हा पुन्हा ते सांगत होते आणि त्यांनी माझ्या समोर चार ऑप्शन ठेवले . म्हणाले या चार मध्ये तू ' ट्राय ' करू शकतोस . जा जिले आपनी जिंदगी.
ती टेस्ट एकदाची संपली . अव्या ला फार्मसी आलं होतं. आम्ही गप्पा मारत जात होतो, भूकही  लागली होती.
रस्त्याच्या एका बाजूला पाणीपुरी च्या गाडीपाशी बरीच गर्दी जमली होती.
" इथली खाल्लीएस का पाणीपुरी?" अव्या ने विचारलं
" नाही रे"
"काय लेका तू, चल मी देतो पार्टी तुला"आता तुम्हीच विचार करा एखादा मित्र स्वतःहून पार्टी देतोय म्हणल्यावर ती पाणीपुरी आणि तो माणूस किती प्रसिद्ध असेल?
 मी लगेच हो म्हणलो.
आम्ही त्या गाडीपाशी गेलो, आणि मी त्या माणसाला पाहिलं आणि हादरलोच. त्या माणसाचा पाणीपुरी बनवण्याचा वेग हा लोकांच्या खाण्याच्या वेगापेक्षा कितीतरी जास्त होता. एका वेळेस तो अनेकांना पाणीपुरी देत होता. बर हे सगळं करताना तो चुकत होता का? तर ताशातलाही भाग नाही.मला क्षणात विचार आला का याने दिली आले का अॅप्टीट्युड टेस्ट? त्या माणसाकडे बघून जाणवलं की कुठलाही क्षेत्र हे मोठं नसतं त्यात काम करणारी माणसं मोठी असतात . मन लावून काम करतात. कुठल्याही क्षेत्राला असा स्कोप नसतोच मुळी , तर स्कोप आपल्याला असतो.
काही दिवसांनी रिझल्ट लागला( किती मिळाले सांगत नाही. चांगला लागला एवढंच). त्यानंतर वेगवेगळी कॉलेजेस् पहिली , फिल्ड ठरवलं त्या फिल्ड मध्ये मला पुढची वर्ष खेळायचं होतं.
कॉलेजच्या ऑफीसमध्ये मी फॉर्म जमा केला होता. संपूर्ण नातेवाईकांच्या नजरा माझ्यावर खिळल्या होत्या. हो, कारण मी कोणालाच सांगितलं नव्हतं. मी माझ्या कलाने ' कला ' क्षेत्रात प्रवेश घेतला होता. वाऱ्यासारखी बातमी पसरली. मला वाटलं संपलं सगळं आता आराम पण हे कधी संपत नसतं.
एका भयंकर सकाळी फोन आला आणि दुसऱ्या बाजूने विचारणा झाली-

"मग पुढे काय करणार?"



छायाचित्र - अर्पिता रोकडे

Monday, March 26, 2018

एक शाही आजार

दोन दिवस झाले मला झोप नव्हती नुस्ता बेडवर पडून होतो . या दोन दिवसात मी फक्त ताकावरच होतो. त्याचं कारणही तसंच  होतं म्हणा मला एक आजार झाला होता -' अॅसिडिटी'.  खरंतर खूप पूर्वी  नुस्त ' अॅसिडिटी ' झाली असं म्हणायचे  पण आता त्याचं प्रमोशन आजारात झालंय. या आजाराविषयी माझ्या मनात प्रचंड चीड आहे. अहो, हा आजार  सांगून येत नाही हो ; ताप वगैरे कसा आधी डोकं दुखत मग थंडी भरते आणि मग ताप येतो.पण याचं तसं नाही हा भॉक करून येतो कि दुसऱ्या दिवशी छातीत जळजळ .
वास्तविक मला कधी जळजळ जाणवली नाही एकदाच जाणवली ज्या वेळेस माझ्या अत्यंत प्रिय मित्राने " अरे ! मी कसला अभ्यास करतोय  हँ हँ हँ!! " असं म्हणून परीक्षे मध्ये दोन पुरवण्या मागितल्या होत्या तेव्हा .

पण ऍसिडिटी ला मानावं लागेल हां ! म्हणजे बघा ना १० वर्षांपूर्वी खिजगणतीत नसलेला हा आजार आता जवळपास प्रत्येकाच्या गळ्यातलं ( छातीतलं ) ताईत हून बसलाय . एवढी प्रसिद्धी  कोणत्याही आजाराला मिळाल्याचं मला आठवत नाही .
हा आजार  जडायला काहीही कारण लागत नाही. आता माझंच बघा ना ; हा आजार मला पकडायला अतिशय शुल्लक कारण आहे . त्याचं झालं असं की -
 माझा मित्र सुहृद हा पुण्याच्या बाहेर राहतो . शाळेत तो आणि मी एकाच बाकावर बसायचो . शाळा संपली आणि तोही त्याच्या गावी निघून गेला , त्यानंतर त्याची आणि माझी भेट झाली नाही . एकत्र बसणं ते फक्त व्हॉट्सअँप  वर . अचानक त्याचा मेसेज आला "पुण्यात चक्कर टाकतोय भेटू या" आणि मग पुणेरी पद्धतीनं बेत ठरला की सकाळी मिसळ खायची ,दुपारी तो त्याची काही कामं करणार आणि दुपारचं जेवण करून त्याला स्टेशन वर सोडायचं बस्स .
ठरल्या प्रमाणे मी मिसळ खायला पोहोचलो. खरंतर मला तिथे फक्त  सुहृद अपेक्षित होता पण तिथे त्याच्या बरोबर दोन सुशील मुली ही  आल्या होत्या .
" अरे, या सुद्धा आपल्या सोबत नाश्ता करणार आहेत,त्याचं काये  परत कधी भेटणार म्हणून त्यानाही  आत्ताच बोलावलं चालेल ना ?" सुहृद.
"अरे !!चालेल ना काही हरकत नाही" मी (मी का नाही म्हणू!!)
" बरं मी मिसळ घेऊन येतो" तो म्हणाला.
"ठीक तू म्हणतोस तसं".
 आम्ही टेबल पकडलं मिसळ आली.मी आपले सारे मिसळ खाण्याच्या आधीचे सगळे संस्कार करून घेतले म्हणजे तर्री ओतणे , कांदा  टाकणे इ.
आ हा हा हा !!!! काय दिसत होती तुम्हाला सांगतो - 'मिसळ' .
मी पहिला घास तोंडात टाकला आणि जवळपास सहा ताड उडालोच!!. प्रचंड तिखट असा तो प्रकार माझ्या जिभेवर पडला आणि तळपायापासून मस्तकापर्यंत मला तिखट झोंबलं. पण समोर बसलेल्या दोन माता आणि एक मित्र यांच्या समोर काहीच करता येत नव्हतं . मी आपलं हसत तो घास गिळून टाकला. तुम्हाला सांगतो ,तो घास गिळताना आपल्या शरीरातून गरम असं काही पोटात जातंय असं जाणवलं. अहो ,टाकून उठायची ही पंचाईत . बरं मलाच तिखट मिसळ दिली होती का? कारण समोरचे तिघे मस्त आनंदाने खात होते .  तोंडचे पाणी पळणे म्हणजे काय याचा प्रत्यय मी त्या दिवशी घेतला . डोळ्यातलं पाणी तर मी आत टाकत होतो म्हणा ना!! उगाच डोळे किलकिले करून काय  बघ, उगाच हसून  काय बघ.  एक एक घास मी हळू हळू घेत होतो. भर थंडीत मला दरदरून घाम फुटला होता.
मला बघून तिथल्या वेटर ने पंखा फुल्ल केला.पण याने बाह्य शरीर थंड होतं हो, पण आत जिभे पासून जठरा पर्यंतचं सगळं वातावरण तापलं होतं त्याचं काय? काही वेळाने मला पाव पण तिखट लागू लागला . पण एवढं तिखट असून देखील मी त्यांच्या समोर हू की चू आणि हा नि हू केलं नाही( पर्याय नव्हता). एक मिसळ खाण्या मध्ये मी चार शेंगदाण्याचे लाडू , तीन खोबऱ्याच्या वड्या आणि पाच काजू च्या वड्या सम्पवल्या. सुहृद बरोबर फिरणं खरोखर जिव्हाळी लागलं होतं, कारण दुपारी तसंच  चमचमीत जेवण झालं . कसा बसा त्याला स्टेशन ला पोहोचवून मी घरी आलो .माझी हालत म्हणजे दिवसभर काम करून आलेल्या कारागिरसारखी झाली होती अत्यंत 'घामिष्ट' स्वरुपात मी होतो  . रात्री जेवण केलं नाही तसाच झोपलो.

 खरा त्रास सुरू झाला तो  रात्रीपासून  . रात्रभर झोप नाही सतत मळमळ . रात्र तशीच जागरणात सरली . दुसऱ्या दिवशी सकाळी थंडगार दूध प्यायलो पण काही फरक नाही . गुलकंद खाल्लं तरी काही नाही. हा अॅसिडिटी चा त्रास जळवांसारखा अंगाला चिकटून नुसतं रक्त आटवत होता . दुसरी रात्र ही तशीच जागरणात  गेली. मग मात्र नाईलाजाने डॉक्टरांकडे गेलो. तर त्यांनी सांगितलं की हा त्रास दोन रात्री जे जागरण झालं त्याने वाढलय. काळजी घ्या नाही तर हा त्रास वाढणार.हे 'काळजी घ्या हां!!' हेच वाक्य इतकं भयानक आहे की त्यांनेच पेशंट वर दडपण येतं. त्यांनी पथ्य लिहून दिली . मला पथ्य हा प्रकारचं आवडत नाही म्हणजे तो माझ्या पचनीच पडत नाही. एकवेळ इंजेक्शन द्या पण पथ्य नको.
माझ्या मित्रांचं यावर वेगळं मत होतं- एक म्हणे तू होमिओपॅथी ची औषध घे त्याने त्रास  एकदीवसात बरा  होतो; एक म्हणे " तू चूर्ण घे रे तुला कळणार सुद्धा नाही सकाळी आत जाताना ऍसिडिटी; बाहेर येताना गायब!!!" दुसऱ्या एका मित्राचं तर वेगळं म्हणणं होतं त्याच्या मते ऍसिडिटी हा मानसिक रोग आहे त्यामुळे मी कसलीही चिंता न बाळगता दणकून खावं!! ;   एकाने तर मला ENO घ्यायचा सल्ला दिला. हा हन्त !! त्या सारखे भयानक पेय  मी आजवर पहिले नाही .त्याच्या पण पायऱ्या असतात घेण्याच्या .म्हणजे आधी संपूर्ण पेलाभर पाणी घ्यायचं त्यात ते ENO टाकायचं आणि कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता  गटागटा पिऊन टाकायचं. आणि  अरे रे !! त्याच्या झिणझिण्या मेंदूपर्यंत जातात .मी ते एकदाच घेतलं त्या नंतर त्याला तोंड  सुद्धा लावलं नाही.

पण आमच्या घरी युद्धपातळीवर तयारी सुरू होती. 'वैद्य' आडनाव असल्यामुळे घरातली जुनी आयुर्वेदिक  पुस्तकं बाहेर निघाली  आणि प्रत्येक जण मला डोस पाजू लागला आई म्हणाली की "ही घे सुतशेखर" तर आजी म्हणायची "सुतशेखर ने काही होणार नाही आलं आणि लिंबाचा रस घे" तर आजोबा आणि बाबा यांचं मत होतं ते  असं की मी रोज नीरा प्यावी. आता खरतर हा विषय घरच्यांपुरता मर्यादित नव्हता  तर  संपूर्ण महाराष्ट्रात जेवढे कुटुंबीय होते त्यांचे फोन सुरु झाले . आमच्या घरचे म्हणजे मला दुर्धर आजार झालाय कि काय असं सांगत होते  . ते काही उपाय सुचवत होते .
यात आमच्या कडे रोज आईस्क्रीम आणलं  जात होतं इतका हा  शाही आजार असेल याची कल्पनाच नव्हती . याला बाकीच्यान्सारखी क्रोसिन चालत नाहीत तर  वेगळी औषधं  , मस्तानी ,थंड दुध ,कुल्फी असे शाही उपाय लागतात .

पण या सगळ्या गुंत्यातून आमच्या घरच्यांचं ताकावर एकमत झालं आणि आमच्या घरात ताक बनवणं सूरु झालं .
अहो या जगात तिखट खाणाऱ्या विषयी माझ्या मनात प्रचंड आदर निर्माण झालाय . पोपटाविषयी तर अधिक.अहो तो तर नुसत्या मिरच्या खातो . त्या देवाला सुद्धा जास्त तिखट ,कांदा,लसूण चालत नाही  पण इथे भूतलावर बघा - वाडापावातल्या नुसत्या मिरच्या खाणारी हि लोक आहेत .

असो त्या दिवशी मी ताकाचा पाचवा ग्लास संपवला आणि मला शांत झोप लागली.
        आणि अॅसिडिटी चा हा  त्रास या अमृताने मुळापासून उपटून काढला


छायाचित्र - अर्पिता रोकडे 

Wednesday, March 14, 2018

मराठी



आज महाराष्ट्रात आनंदी आनंद होता. संपूर्ण महाराष्ट्र वसंत ऋतूच्या सुखद वातावरणात गढून गेला होता.निसर्गात अत्तराचा सुवास दरवळत होता. झाडे बहरली होती , टपोरी फुलेसुद्धा आज घडणाऱ्या आनंदोत्सवाचे गाणे गात होती. महाराष्ट्राच्या कन्यारत्नाचे आज बारसे.त्याचीच ही सगळी तयारी सुरू होती. बाळासाठी इथल्या मातीचा पाळणा केला. तरुलतांनी त्यावर तोरण चढवले.
दूधसागर आपला नगारा घुमवीत होता , वारा मधुर बासरी वाजवीत होता, अर्णवाच्या लाटांनी मंत्रोच्चार सुरू केले होते.

बाळाला आशीर्वाद द्यायला
पंढरीचा पांडुरंग आला. टाळ,मृदुंगाच्या गजराने संपूर्ण आसमंत भारावून शुद्ध  झाला. कोल्हापूरची महालक्ष्मी काजळ घेऊन आली. तिने बाळाच्या डोळ्यात काजळ घातले,"किती गोड दिसतंय नाही!!"ती म्हणाली. तुळजापूरहून आई भवानी तीट लावायला आली. तिने बाळाच्या भाळी तीट लावले"आता बाळाला कशाचीच दृष्ट लागणार नाही" ती म्हणाली. माहूरची रेणुका आई पाळणा गाण्यास आली. जेजुरीचे खंडेराय आले. म्हाळसाई बाणाई लिंबलोणं उतरवण्यास आल्या.मोरगावचा मोरेश्वर आला,वेरुळचा घृष्णेश्वर आला.
सह्याद्री आणि सातपुड्यांनी बाळाच्या हातात बिंदल्या आणि मनगट्या घातल्या. पुढील अनेक वर्षे यांच्यात तर अंगणात बाळ खेळणार आहे, बागडणार आहे,मोठं होणार आहे.
कृष्णा,गोदा,वर्धा,इंद्रायणी यांनी बाळाच्या पायात चाळवाळे घातले.
पवना,पूर्णा, तापी,भीमा,पुष्पावती यांनी पाळणा दिला.
जिच्यासाठी ही सारी मंडळी खोळंबली होती ती वीणापुस्तकधारिणी, विश्वमोहिनी, जगद्वव्यापीनी शारदा आली. बाळाची दृष्ट काढली गेली. औक्षण झाले आणि आपल्या मधुर आवाजात तिने बाळाच्या कानात नाव सांगितले . दाही दिशांनी ते नाव त्रिखंडात पोहचवले...
             *ii मराठी ii*

      (संदर्भासाठी मदत - राजा शिवछत्रपती, महाराष्ट्राचा भौगोलिक इतिहास आणि आपण सर्वांनी लहानपणापासून  ऐकलेल्या  गोष्टी)