Friday, April 10, 2020

पक्के शेजारी -२

......मला हा त्रास सतत होतो गाण्याचा कार्यक्रम , नाटक , चित्रपट हा शेजार मला अतिशय त्रासदायक ठरलाय. मागे एकदा एका नाटकाला गेलो होतो. उशिरा पोहोचल्यामुळे मागची सीट मिळाली. पहिला प्रयोग असल्यामुळे  नाटकाला अपेक्षेपेक्षा गर्दी .. पडदा उघडला आणि जोरात Announcement झाली. “कोपराssssss”(३दा) मी दचकलो . क्षणभर मला प्रेक्षकातलं कोणी ओरडलं कि काय असं वाटलं(नवीन नाटक असलं कि काहींच्या अंगातली पुरुषोत्तम ची सवय जात नाही). परत Announcement झाली “कोपरा”(परत ३ दा) आता हि मात्र अगदी दबक्या आवाजात झाली म्हणजे खरोखर पिटातल्या माणसाला सुद्धा स्टेजवर कोणी तरी पुटपुटल्याचा भास झाला असावा. कारण उगाच त्याने विंगेत पाहून हातवारे केले. लेखक , दिग्दर्शक कोणाचही नाव सांगितलं नाही (बहुतेक नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांच्या आवेशावरून ठरवणार असतील ) स्टेज वर प्रकाश पडला, कसं बसं स्टेज दिसेल एवढाच. स्टेज च्या डाव्या ‘कोपऱ्यात’ मागे एक खुर्ची ठेवेलेली दिसत होती .तिकडे लक्षपूर्वक बघतोय तो पर्यंत  एक माझ्या वयाचा (तरुण ) मुलगा स्टेज वर जणू काही विंगेतून दाणकन पडला नाही आपटलाच तो . तेवढ्यात माझ्या शेजारून “क्या बात है, सिम्बॉलीझम ” असा आवाज आला. मी पाहिलं तर एक काका अगदी तल्लीन होऊन ते नाटक बघत होते. डोळ्यात अगदी ‘आजि म्या नटश्रेष्ठ पहिले’ असे भाव होते.खर सांगतो सिम्बॉलीझम या शब्दाची भीतीच वाटते मला आपल्याला जे कळाल नाही ते “सिम्बॉलीझम रे!!नाही कळणार तुला” हे वाक्य सर्रास टाकतात.  मला पहिले ते स्टेजवरच्या नटाचे वडीलच वाटलेपण हा च तो अतिसामन्य प्रेक्षक मी ओळखलं. आता नाटक रंगत आलं होत , (नाटककारानुसार). आणि मला हळूहळू मला नाटक कळण बंद व्हायला लागलं होत . एकतर मला जेवढ कळत त्यानुसार नाटक घरात घडत होत.पण असंबद्ध बोलण चालू होत. “सागराच्या लाटांवरून क्षितिजापर्यंत जायचयं” अरे म्हणजे काय ?? बोलायचं म्हणून आणि लिहायचं म्हणून... नवऱ्याबायकोच्या भांडणात सागर आणि क्षितीज कुठून आलं हेच कळत नव्हत. आणि हळू हळू शेजारचा मनुष्य मोर्चा माझ्याकडे वळवू लागून मी पण त्या मोर्च्यात सामील होऊन “क्या बात है”, “काय लिहिलंय”, “काय घेतलाय संवाद” या आरोळ्या देऊन थेटर दुमदुमून टाकाव अशी इच्छा होती. थोड्यावेळाने  ‘तुझी नजर माझ्यावर पडली आणि मी १२ हि ऋतूत  न्हाऊन निघालो” असं नट म्हणाला .यांत  आता तू मला पाहिलं आणि मी प्रेमात पडलो इतका सोपा अर्थ होता. पण ह्या माणसाला त्यात काय जिवनाच तत्वज्ञान कळला समजलं नाही. “ पाहिलं पाहिलं ? श्रीमंत आणि गरीब यांची दरी १२ ऋतूंनी कशी दाखवलीये ?” माझ्या घशात “कशी?” हा प्रश्न अडकून ठेवला होता. पण कसं होत न मला नाटक बघायचं होत म्हणून मी नेहमीचं “ह्म्मम्म्म हो ना” असं समर्पक उत्तर दिलं.
“मी जेव्हा परीक्षक होतो न तेव्हा सादर झालं होत हे नाटक आणि मी तेव्हा या नाटकाला पाहिलं बक्षीस मिळाव म्हणून भांडलो होतो” झालं. माझ्या पोटातच गोळा आला. दुसरी कडे उठून जाणं शक्य नव्हत कारण थेटर भरलं होत. जवळ जवळ पाऊणतास मी कसा बाकीच्या परीक्षकांशी भांडलो, आणि तरी हि दुसर्या नाटकाला बक्षीस कसं दिल , आजकाल लोकांना नाटक कसं कळत नाही.हे ऐकत होतो . शेवटी नाटक संपल(एकदाचं).मी पटकन बाहेर पळालो. आणि आता एक तर कळणाऱ्या नाटकाला जातो आणि कोणाला तरी घेऊन जातो (जे जे आपल्याला मिळेल ते ते वाटून घ्यावे या धर्मानुसार)
प्रत्येक च शेजारी काही त्रासदायक असतो असं नाही काही काही शेजारी सुखावह पण असतात. पण असे शेजारी शेजार पेक्षा समोरच्या खिडकीत , बाल्कनीत असावे असे अनेक कवींनी , चित्रपटात म्हणल्या मुळे शेजार नको पण समोर खिडकी किवा बाल्कनी असावी. चित्रपट नायीकांसारखी कोणीतरी असावी. ज्या बाल्कनीतून  त्या नायिका फक्त ‘हाय’ करतात . आमच्या नशिबात नाही असं काहीही नाही आणि असेल तरी आपल्याला बघेल असं वाटत नाही.
पण कधी कधी असं वाटत कि शेजार हा प्रकारच देवाने का तयार केला असेल? माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे म्हणून तो शेजार स्वीकारतो का,लादला गेला म्हणून. पण मग शेजारच्या काकू “कोलंबीच लोणच आवडत याला म्हणून खास वाटीभर आणल” असं म्हणतात “गावाला गेलो होतो ऊस आणलाय चांगला गोड बघून आणलाय” असे भिसे काका असो, किंवा “आज तुषार चा फोन आला नाही ते स्काईप कसं करायचं ते शिकव न जरा” असा एक आवाज येतो. आणि मग असं वाटत कि हां पण स्वीकारला नाही किंवा लादला नाही तर तो आपण मागून घेतलाय. माणसाने प्रगती केली ती या शेजाऱ्यांबरोबर . शेवटी काय शेजारी हा पहिला पहारेकरी . आपण घरात नसताना तुमचं  पार्सल जपून ठेवणारे शेजारी. घराची किल्ली विश्वासाने ठेवतो ती त्यांच्याकडेच. असा विचार करून मी आपले सारे राग गिळून टाकतो. त्या ज्या कोणी पहिल्या माणसाने देवाला शेजाऱ्यांची ऑर्डर दिली आणि देवानी एक न देता नेहमी प्रमाणे एकावर एक फ्री दोन दिले असणार. तेव्हा त्या माणसाचे काय झाले असणार. आणि तशा ऑर्डरी देवानी आजून किती तयार करून ठेवल्यात कोण जाणे. शेवटी विचार संपतो. शेजारच्यांचा कुत्रा भुंकत राहतो, दुसऱ्याबाजूच्या घरातून कुकर ५ शिट्ट्या मारून थकलेला असतो. आणि मी मात्र तावडीत सापडू नये म्हणून मूक गिळून बसतो.

Monday, April 6, 2020

पक्के शेजारी


सार्वजनिक क्षेत्रात सर्रास आढळणारा माणूस प्राणी म्हणजे शेजारी.ते घराशी निगडीत असो, बस, हॉटेल... त्यांचा सहवास लाभल्यावाचून आपल्याला गत्यंतर नाही.
देवाने माणसाची घडण करताना त्याच्या बरोबर हा शेजारधर्म अशी एक गोड (आपल्यावर) गोष्ट देऊन पाठवली आहे. “जरा साखर देता का?” ह्यासारख्या व्याख्यांनी शेजारधर्माला बदनाम करून टाकलंय. पण तसा शेजार  गुण्या गोविंदाने करायचा वगैरे चा काळ गेला आणि आता “तुमचं पायपुसणं जर परत आमच्या दारात दिसलं तर खिडकीतून खाली टाकून देऊ” असा चालू आहे. अलीकडली गोष्ट आहे.
दुपारचे ४ वाजले होते. ऊन कमी झालं होत म्हणून मी मित्राकडे जायला बिल्डींग मधून खाली उतरलो आणि पायऱ्यांच्या खिंडीतच मला गाठून घोसाळकर आजोबांनी दार उघडून मला विचारलं “काय?” आता या प्रश्नाला काय उत्तर द्यावं हे मला कधीही कळलेल नाही. मराठीत असे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरच नाहीत . जस कि हे ‘काय?’ , ‘कसं काय?’, ‘कसं चाललय’ आणि ‘बाकी?’ मुळात ‘बाकी’ हा प्रश्न कसा आसू शकतो.गणिताच्या एका शिक्षकाला मराठी विषय शिकवायला लागल्या मुळे  शब्द मराठीत आला असावा !!!! बाकी काही नाही  .
“काय?” पुन्हा एकदा त्यांनी विचारलं. मी काय या प्रश्नाला “काय?” याचं प्रश्नाने उत्तर दिल. “आज घरी जंगी बेत होता म्हणे” (ते नामा म्हणे तुका म्हणे जसं संत वाङ्मयात आहे , तसं शेजार-भंगात ‘होता म्हणे’ आहे. जो सगळ सांगतो तो होता!! ).
मी आपलं जेवढ आश्चर्य दाखवता येईल तेवढं दाखवत “हो!!! तुम्हाला कसं कळल?” खर तर हो एवढं उत्तर देऊन तिथून निसटता येता आलं असते पण आयत्या वेळी ह्या शेजार्यांकडे संमोहन शक्ती असते दुसरे विचार च ते येऊ देत नाहीत.
“कळल मला .आज बाबा बरोबर भाजी आणायला बाहेर पडलास ना ते पाहिलं मी खिडकीतून”
खर तर मी पण त्यांना म्हणणार होतो पार्कात जायच्या नावाखाली कुठे जातात ते मी पण खिडकीतून पाहिलंय. पण मी माझे पत्ते राखून ठेवतो.
“फ्लॉवर बटाटा भाजी आणि आमरस , भजी पुऱ्या बेत उत्तमच कि” या काकांना हे सगळं कळल कुठून हा मला प्रश्न पडला .पण मग काही महिन्यानंतर मला कळल कि हि एक gang आहे. हे सोसायटी मधले आजोबा लोक under home एक संस्था चालवतात. एकमेकांना सगळ्या बातम्या कळत असतात हे मला आमच्या घरचा बेत अख्ख्या बिल्डींग ला कळला तेव्हा लक्षात आलं.
“ तुम्हला माहितीच आहे न सगळं “ मी जरा अंमळ वैतागून बोललो
“शेवटच वर्ष न रे तुझं “ या विषयावर
“हो आणि बहुतेक तुमचं सुद्धा” हा हन्त!!! हे वाक्य बोलताना मी त्यांच्या gang च्या मूळ विषयावरच घाव घातला. आणि नंतर आई बाबां चे अनेक घाव , वार मला सोसावे लागले . थोडक्यात कोण  शेजारी ठरवायचे आपल्या नशिबात नाही. मी म्हणेन लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जात असतील तर शेजार गाठ हि सुद्धा गत जन्मीच्या पाप पुण्यावरून च बांधली जाते.
अशीच एका शेजार्याशी माझी गाठ एका पुस्तक  प्रदर्शनात पडली. आपल्या आवडीची पुस्तक घायला मी तिथे गेलो होतो.आणि अगदी गर्दी नसेल अश्या वेळेस गेलो होतो. पण म्हणायला प्रदर्शनात गर्दी होती (२० माणस!!! पुस्तक प्रदर्शनात हि गर्दीच म्हणायची). मी कविता सेक्शन च्या इथे कुसुमाग्रज,बोरकर वगैरे पुस्तक बघत असताना अगदी शेजारून “वाह वाह” असा आवाज आला. मी एकवार पाहिलं तर एक वाचक सादरीकरणाच्या तयारीत दिसत होता. कोणाच्या तरी कवितांच पुस्तक हातात होत. आणि वाह वाह मुद्दाम माझं लक्ष जावं आणि मी प्रेक्षकाच काम कराव या साठी केलं होत. मी आपलं स्मितहास्य केलं . त्यावरून त्याने ‘कोणती कविता असेल बर’ असा विचार मी केला असावा असा त्याने विचार करून ते पुस्तक माझ्या समोर धरलं “वाचून बघ तरुणांच्या कविता आहेत” पुस्तकाच नाव होत ‘तृणाचे पिवळे देठ’.
अच्छा”
“एक एक कविता म्हणजे तरुणांच्या मानत काही तरी करून दाखवण्यासाठी प्रेरित करते.आता हि बघ” असं म्हणून त्यांनी कविता ऐकवायला सुरवात केली
“ डोंगराचा कडा आहे काळा काळा
मनाला लावलाय ताळा ताळा
विचार म्हणताय पळा पळा
काळा कडा दिसतो लांब
त्याच्या वर जाऊन थांब (वर या शब्दावर इतक्या मोठ्या आवाजात जोर दिला कि आजूबाजूचे लोक दचकून बघायला लागले )
दिसेल तिथून जग सारे
मोठा हो, मोठा हो प्यारे
डोंगराचा कडा आहे काळा काळा  
हि कविता ऐकून ती कविता फाडून ‘जाळा जाळा’ असं मला झालं होत .त्यानंतर जवळपास पाऊण तास मला स्फूर्तीदायक कविता ऐकवल्या गेल्या. ह्या माणसाच्या शेजाऱ्याने ते पुस्तक लिहिलेलं होतं आणि हा माणूस उत्तम शेजार धर्म पाळत होता.त्या स्फूर्तिदायक कवितांनंतर मी कोणतही पुस्तक न घेता घरी परतलो .
मला हा त्रास सतत होतो गाण्याचा कार्यक्रम , नाटक , चित्रपट हा शेजार मला अतिशय त्रासदायक ठरलाय. मागे एकदा एका नाटकाला गेलो होतो. उशिरा पोहोचल्यामुळे मागची सीट मिळाली होती....
                                                                   क्रमशः