Wednesday, March 17, 2021

डोळ्यामधले आसू पुसती, ओठांवरले गाणे


असे काही दिवस येतात जेव्हा आजूबाजूचं वातावरण अत्यंत सुंदर असतं तुमचा आवडता ऋतू असतो , वेळेत निघालात रस्त्याला गर्दी नाही वेळेत पोहोचलात. एकदम  चांगला चालू असतो दिवस  'पण'... हा 'पण' येतो आणि सगळं सगळं बिघडतं. मनातून बिघडतं . हा 'पण' आहे ना तो भलताच दांगट . कोणत्या ना कोणत्या कारणाने , कोणत्या ना कोणत्या रुपात रोज येत असतो. मग कधी त्याला आपण माणूस म्हणतो  तर  कधी नशीब . मग तो कामाच्या ठिकाणी , घरी , मंदिरात , दवाखान्यात आणि अगदी सोशल मीडियावर कुठेही येतो. 

या 'पण ' च्या अडथळ्यातून कोणी वाचलेला नाही. मग यातून आपण सुटतच नाही का ?  या 'पण' ला घालवायला येतात  ती 'माणसं' . आपली माणसं. आत्ता तुमच्या आजूबाजूला बघा तीच. आपण म्हणतो ना "या माणसाबरोबर vibe जुळते यार" हो तीच. 

तुम्ही विचार करा रणरणत्या उन्हात तुम्ही रस्त्यावरून जाताय आणि अचानक गुलमोहराच्या फुलांनी लगडलेले झाड तुमच्या समोर आले तेव्हा कसं वाटतं?  डोळ्यांनी जेव्हा दुरूनच तुम्ही ती फुलं बघता तेव्हा च शांत , छान वाटायला लागतं. तसं आपली माणसं ही आपल्या आयुष्याचा रस्त्यावरची ही सगळं सग्गळ देणारी झाडं. काही क्षण यांच्या सावलीत बसावं आणि पुन्हा आपल्या रस्त्याने चालू लागावं . तुम्ही बघाल तर ती झाडं आपल्या बरोबर येऊ लागतात. तुम्हाला एकदाच त्या झाडाशी मैत्री करायची आहे मग ते झाड आयुष्यभर तुमच्या बरोबर असेल. हां फक्त स्वार्थ नसावा तुमच्या मनात. 

शेवटी काय हो हा 'पण' येणारच . 

तरीही व्यथा असो , आनंद असो , प्रकाश असो किंवा तिमिर असो... जात पुढे मज राहणे हे आलंच .☺️

Monday, March 1, 2021

बसंत बहार !

 उमललेल्या फुलांकडे ती आता तासभर झाले बघत होती. तीन चार महिन्याआधी लावलेल्या चाफा , मोगरा ,गुलाब आणि तिच्या आवडीचं गोकर्ण याला इतकी सुंदर फुलं आली होती की घराची बाल्कनी अगदी दिवाळीतल्या लायटिंग सारखी दिसत होती. तिला अश्रू अनावर होत होते. तिला की नई घट्ट मिठी मारायची होती त्यांना. हिरव्या पानांना , मऊ फुलांना , कोवळ्या फांद्यांना सगळ्यांना मिठी मारून सांगायचं होत की " अरे किती उशीर लावलात यायला .. मी रोज वाट बघत होते तुमची.. पण आता मी तुम्हाला जाऊ देणार नाही अजिबात."

पण आत्ताच आलेली ती कोवळी फुलं , ही फुलं की नाही अगदी लहान बाळांसारखे असतात. त्यांना अलगद हातात घ्यावं लागतं. आई ला ना कळत च नाही भसकन तोडते फुलं . पण मिठी कशी मारावी ... तुम्हाला जवळ कसं घ्यावं ? .

 उन्हाची एक कोवळी तिरीप झाडा आडून येऊन तिच्या गालावर पडली. गुलाबातून येणाऱ्या त्या प्रकाशाने तिच्या गालावर गुलाबी ठसा उमटवला. त्या उबदार प्रकाशात प्रत्येक झाडाने जणू मिठी मारली . आता तिचा दिवस अत्यंत खुशीत जाणार होता. ती उडया मारत , डोलत बॅग घेऊन कामाला निघाली. फुलं सुद्धा डोलत होती आणि तिच्या परत येण्याची ते वाट बघत होते.