Tuesday, August 6, 2019

भान आहे!!!



मित्रहो,
अवाक् होणं म्हणजे काय असा प्रत्यय माणसाला क्वचितच येतो. परवा म्हणजे  २ ऑगस्टला असाच प्रत्यय आला दोन नाट्यकृती बघताना!!! ‘नाट्यकृती या साठीं कि ‘विचार करा’ अशी कृती या दोन्ही नाट्यप्रयोगात आपल्याला करायला लावते म्हणून.
भरत नाट्य मंदिरात ‘सॉरी परांजपे’ आणि ‘खैरलांजी एपिसोड-२’ हे प्रयोग पाहिले. खरंतर मी यातला ‘सॉरी परांजपे’ चा प्रयोग आधीसुद्धा पाहिला होता (मन भरत नाही कधी कधी) आणि दुसरा पहिल्यांदाच पाहिला. चिन्मय देवनं लिहिलेलं  आणि ऋषी मनोहरने दिग्दर्शित केलेलं ‘सॉरी परांजपे’ हे नाटक बघताना प्रत्येक वेळी प्रत्येक प्रेक्षक नाटकात मांडलेला विषय डोक्यात ठेवूनच बाहेर पडतो. मध्ये तर दोन-तीन लोकांनी संपल्यानंतर वडापावच्या इथे त्या विषयावर गहन चर्चा केली तीसुद्धा मी ऐकली. खर तर हाच नाटकाचा प्रभाव म्हणता येईल; विषय डोक्यातून सुटत नाही हातात वडा-पाव असूनही!!! मी कोणत्याही परिस्थितीत दोन्ही नाटकांच्या कथा मुद्दामच सांगणार नाहीये, तुम्ही स्वतः जाऊन नाटक बघावं अशी माझी इच्छा आहे. चिन्मय चं लिखाण हे अतिशय साधं म्हणजे कोणताही विषय साध्या, सोप्या, वापरातल्या शब्दात तो लिहितो (सांगतो!!) त्यामुळेच  प्रेक्षक शब्दात अडकत नाही आणि त्या लेखनाच्या जोडीला ऋषी, गंधर्व, आदित्य आणि हेमांगी यांचा अभिनय. नाटक हे आभासा सारखं असतं; प्रेक्षकाला “समोर घडतय ते खरं आहे असंच वाटलं पाहिजे” हा त्यामागचा हेतू आणि तो अगदी जमून आलाय.
त्यानंतरच्या नाटकाने तर माणसं जागची हल्लीच नाही (संपल्यानंतरसुद्धा!!!) खैरलांजी हत्याकांडाबद्दल वाचायला बरच मिळेल पण त्याच्या पुढे काय घडलं हे समजण्यासाठी फक्त आणि फक्त हे नाटकच बघावं लागेल म्हणजे डॉक्युड्रामा म्हणा नां!!  या विषयावर नाटक करणं हे मोठं धाडसाचं काम आणि एकपात्री करणं म्हणजे.... असो. सुमेधकुमार इंगळे ने अभ्यासलेले, लिहिलेले, दिग्दर्शिलेले आणि अभिनय केलेले ‘हे’ नाटक. खरंतर वर एकपात्री म्हटलंय त्यातच  हे सगळेच विषय आले. पण मी मुद्दाम परत एकदा हे लिहिले याचं कारण म्हणजे ही सर्व डिपार्टमेंट वेगळी आहेत हे सांगण्यासाठी. एकपात्री असं पटकन म्हणतो आपण ; पण त्यामागे एवढं सगळं असतं हे लक्षात यायला हवं.आणि ते सुमेधकुमार याने एका करंगळीवर उचलावं तसं लीलया पेललंय.
थोडक्यात, ‘आजकल’ या संस्थेने नावाप्रमाणेच आजचे विषय घेतले आणि विचार करायला लावले. “आजकालची तुम्ही पोरं नुसतं मोबाईलवर असता!! देश कसा पुढे नेणारssss” हि वाक्य घशातच  ठेवावी लागतील असे सामाजिक भान ठेवून अभ्यास पूर्ण केलेले हे प्रयोग. पुन्हा याचा प्रयोग असेल तर नक्कीच बघायला जा.


Monday, May 6, 2019

नाटक कसे लिहावे??

“अरे थांब रे, एका रात्रीत लिहून देतो नाटक!!! आणि ते पण युनिक विषय घेऊन!!!” नाट्य लेखकाचे हे शब्द जेव्हा जेव्हा मी ऐकतो तेव्हा मी खरोखरच भारावून जातो. भल्या भल्यांनाहि जे जमत नाही ते  प्रकृतीच्या माणसाने करून दाखवले आहे.
नाटकात काय कराल?? असे जर कोणी विचारले तर थोर विचारवंत “लेखन” असे म्हणतात. भरतमुनींनी एवढं नाट्यशास्त्र जरी  लिहिलं असलं तरी सगळ्यात कठीण काम म्हणजे नाटकाचे लेखन त्यांना जमू शकले नाही आणि त्या शोकामध्ये  त्यांनी पुढचे ग्रंथसुद्धा बहुतेक लिहिले नाही. म्हणून नाट्य लेखकाचे स्थान उच्च आहे ( दिग्दर्शकाने लक्षात ठेवावे!!!)
     माझ्या लेखक मित्राने एकदा इडलीचा घास खाताना सहज म्हटले “नाटक लेखन ही ६५ वी कला आहे  कोणालाही सहजच अवगत होत नाही” हे वाक्य त्या ‘एकदा’ पासून आतापर्यंत माझ्या डोक्यात फिरत राहिले आहे.  65 वी कला चौसष्ट कलांचा अधिपती गणेशाला सुद्धा जमू नये म्हणजे नवल झाले. तर हि ६५ वी कला अभ्यासण्यासाठी मी अनेक ग्रंथ वाचले.यावरून नाट्यलेखन हे ‘झटपट इंग्रजी शिका’ सारखे शिकता येत नाही त्याला चांगली बैठक लागते या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहे.
अनेक (खरतर अगणित!!) ग्रंथ वाचल्यानंतर ‘आम्ही’!! (खूप अभ्यास केल्यामुळे ‘आम्ही’ लावले आहे.या मुळे विद्वान वाटतो. तसा ‘मी’ पणा माझ्यात नाहीच) नाटक कसे लिहावे या शोधावर पोचलो. हा शोध आम्ही या लेखस्वरुपात आपल्या समोर मांडत आहोत.या शोधातून अनेक मोठे मोठे नाट्य लेखक व्हावे अशी आशा आहे {होणारच}. तरुण लेखकांना याचा फायदा होऊन ते मोठे लेखक होतील, या सामाजिक कार्यात आमचा थोडासा हातभार लावत आहोत.
यंदाचा सिझन पाहता नाट्यलेखनाला चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे नव्या लेखकांची संख्या अधिक. याचा फायदा अगणित नवलेखकांना होणार (त्यामुळे प्रकाशकांनी त्वरित संपर्क साधावा...आम्हाला.) त्यामुळे जराही वेळ न दवडता ( नाट्यलेखकाने  जराही वेळ दवडू नये!!) मी (आम्ही!!) सुरुवात करतो.

||श्री गणेशाय नमः||

लिहावे कसे हे कळेना जनासी  |
म्हणोनी प्रभुने धाडियले आम्हासी |
सांगतो कसे लिहावे नाटकासी |
नमन करून एकवार त्या प्रभूसी  ||

 नाटक किंवा नाट्य लेखन करण्याआधी नाटक म्हणजे काय हे आधी समजून घेणे गरजेचे आहे. तर “नाटक म्हणजे जमिनीला फुटलेले कोंब” (पहा :– स.भा. दिवरे ‘नाटकाचे फुल’ पान.६३) या वाक्यानुसार नाटक हे नाजूक असते. तसेच त्याला हाताळावे.लेखन हि नाटकाची मुळं आहेत (root).ते जर भक्कम असतील तर नाटक मोठे वाढेल असे आम्हाला वाटते. येथे हे नमूद करायला हवे कि नाटक जरी नाजूक आहे असे सांगितले असेल तरी नाटक करणारे नाजूक नसतात (सल्ला-तुम्ही नाजूक असाल तर तुम्हाला खरं सांगतो.. झेपणार नाही!!! ).वरील व्याख्येनंतर इतर सध्या व्याख्या –

नाटक म्हणजे समाजाचा आरसा
नाटक म्हणजे आभास
नाटक म्हणजे अस्तित्व इ.इ.इ.

हि वाक्ये तुम्हाला विविध कॉलेजात ऐकायला मिळतील (परंतु आम्ही प्रथम सांगितलेली व्याख्याच अधिकृत धरावी). या वरील तीन व्याख्या या ज्यांनी त्या तयार केल्या त्यांच्या प्रमाणे अगदी ‘ढोबळमानाने’ आहेत .
तर आता तुम्हाला नाटक म्हणजे काय हे लक्षात आलं असेलच. तर आता मुख्य प्रशिक्षणाकडे वळूयात.

पायरी १ :- नाटक लिहायचे मनात ठरवल्यास लगेच ते लिहू नये. चार दोन लोकांना आपली कल्पना सांगावी आणि हसून “ लिहितोsssय एक नाटक!!” असे साधेच बोलून; म्हणजे अगदी शुल्लक आहे असे म्हणून कोण यावर काय प्रतिक्रिया देतय, ते बघावे. कोणी प्रतिक्रिया देवो अथवा न देवो आपल्याला लिहायचाच आहे हे ध्यानात ठेवा . आता सगळ्यांना सांगून आपला साधारण आठवडा तरी झाला असेलच . या आठवड्यात जर तुम्हाला दुसरं काही करावसं वाटलं नाही तसेच ‘असलं काहीतरी करत बसतो’ म्हणून घरातून काढलं नसेल आणि दिग्दर्शकाचे प्रेशर असेल तर मग आरामात “ हे काय दोन दिवसात देतो” असे म्हणून मोकळे व्हावे.

पायरी 2 :- आता मात्र तुम्हाला लिहावच लागेल अशी वेळ आली असेल. तर आता नाटक लिहिण्याला सुरवात करणार का ? तर नाही!!!! प्रथम लिहिण्या साठी काही वस्तूंची गरज लागते “नाट्य लेखक हा गरजू असतो” [ एकदा पहाच :– ‘गरजवंताची नगरी’ या प्रायोगिक नाटकातील लेखक हे पात्र (हे नाटक तीनदा बघून शहानिशा केली आहे)]
लिहायला बसतानाच मुळी हि षोडशोपचाराची तयारी कारायला लागते. ज्या प्रमाणे एखादा आचारी काही तयार करण्या आधी सामान रचतो किंवा एखादा वादक आपली वाद्य लावतो, डॉक्टर ऑपरेशन च्या आधी हत्यारे तयार ठेवतात त्या प्रमाणे लेखकाने काही वस्तू तयार ठेवाव्याच लागतात. टेबलावर – पेन ,कागद , ग्रंथ भांडार (“लेखकाने जवळच्या पुस्तकामधील शब्द न घाबरता उचलावे.” श.म.नांदे :- ‘लेखक आम्हाला काय कोणाची भीती’ या पुस्तकातील), व्यसन असल्यास विडी / सिगारेट , आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे चहा (“तोंडातून चहा आत टाकला कि पेनातून शाई भरे पडतेच म्हणून समजा” –च.हा. पाजरे- ‘लेखक आणि चहा एक उत्तेजक पेय’ )
तर हे सगळं तयार झालं कि चं अंगात झब्बा अडकवायचा आणि खुर्चीला शबनम टांगायची.आता स्त्री लेखिका विचारतील तर आम्ही त्यांच्याच बाजूने असल्याने त्यांना जे कम्फरटेबल वाटेल ते परिधान करू शकतात ( आम्ही लेखिका – सु .ल. गडे पान क्रमांक – बरेच).

पायरी ३ :- मुळ लेखनाला प्रारंभ -
“ नाट्यलेखनात कथा अत्यंत महत्वाची” (कुठे तरी वाचलंय नाव आठवत नाही पण छान आहे वाक्य !!!)
या नुसार कथा आयती मिळाली तर बरच आहे म्हणून आपल्या जवळच्या ग्रंथ संपदेतील दोन चार गोष्टींची पुस्तके काढावीत .त्यातल्या एका कथेवर किवा एक अर्धी आणि दुसरी अर्धी मिळून एक कथा तयार करून झक्कास नाट्यरुपांतर करावे. नाट्यरूपांतरात तुमचे मनाचे काही किस्से ,कथा जर सिरिअस असेल तर विनोदी वाक्य टाकावेत म्हणजे तुम्ही लिहिलंय याचं समाधान मिलता आणि दिग्दर्शक पण खुश होतो !!!

टीप :- हां इथे लक्षात घेतले पाहिजे कि कोणतेही नाटक असो त्याचा शेवट हा एका रडक्या कवितेनेच करावा. बायका, मुली, आणि कधी पुरुष सुद्धा, नुसते शब्द ऐकून रडले पाहिजेत बघा!!!!

आता समजा बरका; समजा, जर का हे नाट्यरूपांतर दिग्दर्शकाने घेतले नाहीच तर मग ते नाट्य वाचनाला द्यावे तिथे ते हमखास सदर होईल ( हि आमची खात्री आहे).

संदर्भासाठी वाचाच – गुंजारव – कथा :- भोंगा आणि मधमाशी प्रेमकथा 
                पांढरा कावळा  - कथा :- काळाचा घाव 

पुढे जर तुम्हाला नाहीच जमले नाट्यरुपांतर करायला; तर  “काय करणार बॉ !!!” असे प्रश्न पडतील परन्तु (“प्रश्न पडले तर नाटक उभे राहते” – ग.बा.समते – ‘उठा!! आणि उभे राहा’  .-पान नं.-५५ २ री ओळ ). वरील प्रमाणे जर आपल्याला प्रश्न पडले असतील तर सोपा उपाय म्हणजे  एखाद्याचे आत्मचरीत्र घ्यावे.जे कोणालाच माहित नाही अगदी प्रकाशकाला सुद्धा आठवत नसेल असे आत्मचरित्र निवडावे म्हणजे सोय झालीच म्हणून समजा .या प्रकारच्या लिखाणात मात्र इंटेन्स सिन्स खूप टाकावे (राडा ,भांडणं,मारझोड,रडणं*. विनोद टाकू नये ( टवाळा आवडे विनोद – समर्थ रामदास ). या प्रकारच्या लिखाणात पुस्तकातीलच वाक्य टाकावी त्यामुळे स्वतःच्या बुद्धीला, मनाला आणि जवळच्या ग्रंथातील शब्दांना वापरायची गरज पडत नाही.

टीप :-या प्रकारच्या नाट्यलेखनात आपली मनाची पात्र टाकू नये .

*रडणं हा नाटकाचा अविभाज्य भाग आहे हे समजा .सगळ्या रसात नाटकासाठी ‘करून रस’ सर्वोत्तम .अभ्यासावरून  सांगतोय!! छे! छे! आपल्याला नुसतं बोलायची सवयच नाही ना!!
आता तुम्ही आत्मचरित्राचे रूपांतर करण्यात यशस्वी झालाच असाल. हे नाटक ज्याचे आत्मचरित्र आहे त्यालाच विकावे. प्रयोग थांबण्याची चिंता नाही आणि अनोळखी असल्यामुळे वेगळी प्रसिद्धी.

अजून एक टीप – जर आपणास “हे कसे सुचले ?” वगैरे वगैरे विचारलेच तर “ यांत भावनांचे खेळ आहेत”, “या व्यक्तीच्या स्वभावाचे पैलू/रंग दिसताएत” “शून्या पासूनचा प्रवास दिसला’ इ.इ. उत्तरे ठोकावी त्या साठी संदर्भ –(नाट्यलेखकांनी ठोकायची भाषणे –भा.ष.काणे.)

संदर्भासाठी बघा – जेष्ठ नाट्यकर्मी रावसाहेब यांवरचे –मी आणि रिकाम्या खुर्च्या 
              एक लिंबू सरबत आणि समोरची खुर्ची – १२५ प्रयोग झालेले नाटक 
             स्टेजवर फिरताना – पासिंग रोल वर आधारित 
              फुटलेल्या काचा  :- मी बाटली सोडली या प्रसिद्ध आत्म्चारीत्रावर आधारित
    
                                                           

                                  क्रमशः (पुढच्या भागात सुद्धा आम्ही या विषयी बोलूच😁😁)

Friday, January 11, 2019

नसतेच लायसन जेव्हा...



वेळ -(कोणतीही)
माणूस हा विसरभोळाच पण कधी कधी हा स्वभाव अंगाशी येतो आणि....
(हे विडंबन काव्य आहे .त्यामुळे तसंच वाचावं....एखादी चाल जर तुमच्या डोक्यात आली तर तो योगायोग नाही)

नसतेच लायसन जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
मग गाडी धरली जाते
मी चिल्लर गोळा करतो
नसतेच....

नो एंट्रीत गाडी घुसवी
मामा तर दिसतच नाही
दडलेला समोरच येतो
नि गाडीला ब्रेकच बसतो
नसतेच...

एक हाती गाडी धरतो
दुसऱ्या हाती किल्ली निघते
मानेने बोलता त्याने
मी गाडी बाजू करतो
नसतेच...

लायसन त्याने मागावे
मी हसूनच त्याला बघतो
हेल्मेट? बोलता त्याने
मी धाराशाही पडतो
नसतेच....

मज बोर्डच दिसला नाही
मी नवीनच आहे येथे
कारणे दिली ही जरी मी
तो निष्ठावंतच असतो
नसतेच.....

दंडाची किंमत बघूनी
मम पगार संपून जातो
खूप किचकिच करुनि मग तो
* हासून शंभरच घेतो*

नसतेच लायसन जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
मग गाडी धरली जाते
मी चिल्लर गोळा करतो😁😁
         
                                      -अमोघ वैद्य